स्वप्नाने तोडलेली 'ती' साखळी


ती अचानक झोपेतून दचकून उठली. मोठ-मोठे श्वास घेत होती आणि पूर्णपणे गोंधळून गेली होती. असं कसच घडू शकतं? हा एवढा मोठा योगायोग कसा असू शकतो! आश्चर्यचकित झाली होती. आपण अजूनही स्वप्नातच आहोत की काय, असं तिला वाटू लागलं. खात्री करण्यासाठी तिने स्वतःला जोरात चिमटा घेतला, पण तो इतका जोरात बसला की ती 'आई गं!' म्हणून ओरडलीच. आता मात्र तिची खात्री पटली की ते खरंच एक स्वप्न होतं आणि ती जागी आहे.

तिला हे स्वप्न पटकन कोणालातरी सांगायचं होतं— जे तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल. तिने घाईघाईत आवरलं आणि ती थेट एका बुक कॅफेमध्ये गेली. बॅगेतून आपली डायरी काढली आणि लिहू लागली…

"डिअर मी,

आज काय कमाल झाली, माहितीये? मला एक खूप चमत्कारिक स्वप्न पडलं. खूप दिवसांपूर्वी मी निरीक्षणातून माझ्या मनात जो एक प्रश्न टाकला होता, त्याचं उत्तर आज गवसलंय असं वाटतं. स्वप्न पूर्ण आठवत नाहीये, पण कामापुरतं मात्र नीट आठवतंय.

अगं, स्वप्नात मला एक बाई भेटल्या होत्या. कोण होत्या, नाही आठवत. कुठून आल्या, नाही माहीत. आम्ही एका झाडाखाली उभा राहूनच बोलत होतो. त्या सांगत होत्या की, आपल्याकडून एखादी चूक घडली की आपण कळत-नकळत तिचा मोठा 'फुगा' करतो. उदाहरणार्थ, एकदा परीक्षेत कमी गुण मिळाले की आपण म्हणतो, 'मला अभ्यास जमतच नाही.' पण वास्तविक पाहता ती एक घटना म्हणजे संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक वेळी तसंच घडेल असं नसतं. आपण एका चुकीवर इतकं लक्ष केंद्रित करतो की, आपला मेंदू बाकी ९०% वेळा, आपण बरोबर जरी असलो तरी ते विसरून जातो. आणि पुढच्याच क्षणी कस माहीत नाही, पण मला माझ्या आत्मविश्वासाची साखळी लक्षात आली. असं वाटतंय की या स्वप्नाने माझ्या कमी आत्मविश्वासाची साखळी तोडली. आता खूप हलकं वाटतंय."

तिचे खांदे विसावले होते, शरीराला एक प्रकारचा हलकेपणा जाणवत होता. हा निवांतपणा तिच्या चेहऱ्यावरही दिसत होता. 

आत्मविश्वासाशी निगडित असलेल्या अनेक आठवणी तिच्या मनात एकामागून एक येत होत्या. कॅफे मधल्या सकाळच्या शांततेमुळे ती अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होती. ती पुन्हा लिहिती राहिली... 

"मला वाटतं याची सुरुवात तिसरीत असताना झाली असावी. मला ठळकपणे आठवतंय, त्या दिवशी सकाळी पहिला तास सुरू होण्यापूर्वी वर्गशिक्षिका वर्गावर येण्याआधी सगळे जण एकमेकांना गणिताचा गृहपाठ झाला का विचारत होते. छडीच्या भीतीने काही जण तो घाईघाईत पूर्ण करत होते. माझा मात्र गृहपाठ पूर्ण होता. आमची वर्गाची मॉनिटर,—जिला 'पहिलं' येण्याचं खूपच वेड होतं. मग ती प्रार्थनेची रांग असो, वर्गाबाहेर चप्पल काढणं असो किंवा अभ्यास; तिला प्रत्येक गोष्टीत पहिलच यायचं असायचं. तिने तिची उत्तरं तपासण्याच्या बहाण्याने माझी वही मागितली.

मी वही दिल्यावर तिच्या लक्षात आलं की माझीच उत्तरं चुकली आहेत. तिने दुष्टासारखं हसत लगेच सगळ्यांना सांगितलं, 'हिची उत्तरं चुकली आहेत!' त्या क्षणी बाकी मुली ज्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या, त्याने मला खूप एकटं वटायला लागलं. मनात काहीतरी जोरात कोसळल्यासारखं झालं. मी ते गणित दुरुस्त केलं, पण मनात एकच भीती बसली—की सगळे मला ‘माझं चुकत’ म्हणतील. आणि तो अख्खा दिवस याच विचारात गेला की 'माझं चुकलं आणि मला काही जमत नाही.'

याचा परिणाम फक्त त्या दिवसापुरता मर्यादित नव्हता. पुढे मी शाळा बदलली तरीही त्याच एका कारणामुळे मी माझी कोणतीही वही कोणाही द्यायला घाबरत असे. अगदी ग्रॅज्युएशनमध्ये असतानाही मला कोणी एखादा धडा समजून सांगायला किंवा प्रॅक्टिकलमध्ये मदत मागितली, तर मी ती टाळण्यासाठी काहीही करत असे. 'मला तो धडा आता आठवत नाही' किंवा 'मला ते नीट जमत नाही' असं तर अनेकदा खोटं बोलायचे. मित्र-मैत्रिणी माझ्यावर रागवायचे, 'किती भाव खातेस!' म्हणायचे. पण खरं तर, माझ्या मनामध्ये माझ उत्तर बरोबर नसणार हे खूप मजबूत झालं होतं. उत्तर देऊन वाईट वाटून घेण्यापेक्षा गप्प राहून सुरक्षित राहणं मला जास्त बरं वाटायचं. त्या एका चुकीच्या विचाराला मी इतकी ताकद दिली की, बऱ्याच चांगल्या संधी देखील गमावल्या होत्या.

हम्मऽऽऽ... 

स्वप्नामुळे मला आज कळलं की मी त्या एका चुकीचा (जी तेव्हाच सुधारली सुद्धा) नकळतपणे मोठा फुगा केला होता. खरं तर शाळेत असताना मला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळायचे, पण त्या एका चुकीच्या फुग्याखाली ते सगळं झाकल गेले होतं.”

हे सगळं लिहिताना तिचे डोळे पाणावले होते, पण मनावरचा ताण हलका झाला होता. तिने पुढे लिहिले: "जर स्वप्नातल्या त्या बाई आधीच भेटल्या असत्या तर... 

असो!"

पण हा नकारात्मक विचारांचा फुगा मोठा होण्यापूर्वीच कसा थांबवता येईल? तिने पुन्हा हा प्रश्न स्वतःच्या मनात टाकला आणि ती शांतपणे कॅफेच्या बाहेर पडली.

~ नेहा देशपांडे

मे २०२६